परभणी : भाजपाने एका वर्तमान पत्रातील जाहिरातीद्वारे शहरातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप केला आहे. परंतू विरोधकांनीच परभणी शहरातील विकास कामांसाठीचा निधी रोखला असल्याने शहरातील विकासकामे ठप्प झाली असल्याचा प्रतिवार शिवसेना ठाकरे गटाच्या परभणी विधानसभा महिला संघटक अंबिका डहाळे यांनी केला आहे.
भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी गुरूवार, दि.८ ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना परभणी विधानसभा महिला संघटक डहाळे बोलत होत्या. पुढे बोलताना डहाळे म्हणाल्या की, शहरातील ८० कोटीची विकासकामे विरोधकांनी केवळ आकस बुध्दीपोटी रोकली होती. परंतू आ. डॉ. राहू पाटील यांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर हा निधी इतरत्र वळवू नये असे आदेश मा. न्यायालयाने दिले. आता हा निधी पुन्हा मंजूर झाला आहे. परंतू पावसाळा सुरू असल्याने हळूहळू ही विकासकामे करण्यात येतील. तसेच बसपोर्टचे काम देखील अंतीम टप्यात असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल असेही डहाळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मो्या संख्येने उपस्थित होत्या.
…तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन
परभणी मनपाच्या आयुक्त तृप्ती सांडभोर या मनमानी पध्दतीने कारभार चालवत आहेत. मी करेल तो कायदा या पध्दतीने त्या वागत आहेत. मुलभूत कामांकडे लक्ष देण्याऐवजी त्या नको त्या कामांवर पैसा खर्च करीत आहेत. त्या कुठल्या नेत्याच्या नातेवाईक असल्या तरी आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे मनपा आयुक्त सांडभोर यांची येत्या ८ दिवसांत बदली न झाल्यास थेट मुख्यमंत्री यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या अंबिका डहाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.