नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे जानेवारी महिन्यात नवा भाला घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यानंतर अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला आर्थिक मदत केली. त्या मदतीचे त्याने चीज केले. पाकिस्तानला ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देत त्याने मोठा पराक्रम केला. त्याच्या विजयानंतर नीरज चोप्रानेही अर्शदच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि भारताचा नीरज चोप्रा अशी सुवर्णपदकासाठी थेट लढत गुरुवारी रात्री रंगली. त्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. अर्शदला शुभेच्छा देत नीरज पुढे म्हणाला, मी अर्शद नदीमसोबत २०१६ पासून स्पर्धा करतो आहे. आम्ही दोघे एकमेकांविरोधात गेली ८ वर्षे खेळतो आहोत. आम्ही एकमेकांचा खेळ जवळून पाहिला आहे. हे पहिल्यांदाच घडले की मी एखाद्या स्पर्धेत अर्शदकडून पराभूत झालो. पण या विजयाचे श्रेय अर्शदला नक्कीच दिले जायला हवे. यंदाच्या स्पर्धेत अर्शद माझ्यापेक्षा चांगला खेळला हे मी मान्य करतो. अर्शद या सामन्यासाठी खूप परिश्रम घेत होता. त्याने त्याची कामगिरी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचे मनापासून अभिनंदन, असे नीरज चोप्रा सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
दरम्यान, १४० कोटी भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन नीरज चोप्रा भालाफेक करण्यासाठी मैदानात उतरला होता. मैदानी क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले गोल्ड मिळवून देणा-या नीरज चोप्राला यंदाच्या स्पर्धेत सलग दुस-यांदा सुवर्ण कामगिरी करण्याची संधी होती. तमाम भारतीयांनाही तीच आशा होती. पण अखेर त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.