नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि खासदार जया बच्चन यांच्यात शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळत आहे. धनखड यांनी जया बच्चन यांचे नाव घेताना जया अमिताभ बच्चन असे घेतल्यानंतर हा वाद सुरु झाला होता. माझी स्वत:ची ओळख असताना माझ्या पतीचे नाव घेतले जाऊ नये, असे मत जया बच्चन यांनी व्यक्त केले होते. अखेर आजच्या सत्रात जगदीप धनखड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी जया बच्चन यांना अतिशय कठोर शब्दांत सुनावले.
आज (दि.९) राज्यसभेच्या कार्यवाही दरम्यान जया बच्चन बोलण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी धनखड यांच्यावर एक आरोप केला, ‘मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला इतरांची देहबोली (बॉडी लँग्वेज) आणि चेह-यावरील हावभाव समजतात. पण मला माफ करा सर, पण तुमचा बोलण्याचा टोन हा स्वीकारार्ह नाही. आपण सहकारी आहोत’.
जया जी, तुम्ही खूप नाव कमावलं आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय. मी येथे पाहून ब-याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय… आता बास झालं… तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही, असे खडे बोल सभापती धनखड यांनी जया बच्चन यांना सुनावले.
अशा गोष्टींची सवय करुन घेऊ नका. रोज येथे अशा भावनेतून येऊ नका की, तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि तुम्हालाच मान-सन्मान आहे. येथे प्रत्येक सदस्याचा आदर केला जातो. त्यामुळे जो आदर-सत्कार तुम्ही कमावला आहात, त्याच्या लौकिकाला साजेशी वर्तणूक असू द्या. असले प्रकार या सदनात खपवून घेतले जाणार नाहीत, असेही जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांना सुनावले.