25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाविनेशच्या याचिकेतील एक चूक महागात!

विनेशच्या याचिकेतील एक चूक महागात!

निकालाला विलंब, याचिकेत तात्काळ सुनावणीची मागणीच केली नाही

पॅरिस : वृत्तसंस्था
विनेश फोगटने आपल्याला किमान रौप्यपदक तरी मिळाले, यासाठी क्रीडा लवादापुढे याचिका दाखल केली. पण ही अपील करताना विनेशकडून एक मोठी चूक घडली. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागायला विलंब होत असल्याचे आता समोर आले आहे. विनेशने एक तर अंतिम सामना रोखावा किंवा संयुक्त रौप्य पदक घोषित करावे, असे याचिकेत नमूद केले. परंतु या याचिकेवर तात्काळ निकाल द्यावा, अशी मागणी करायची ती विसरली. तसेच तिच्या वकिलानेही तिला तसा सल्ला दिलेला नाही. त्यामुळे यासंबंधीचा निकाल लांबत जाण्याची शक्यता आहे.

अंतिम फेरीपूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यानंतर विनेशने दोन मागण्या केल्या होत्या. त्यात एक तर अंतिम फेरीचा सामना रोखण्यात यावा. जेणेकरून वजन कमी झाल्यास खेळण्याची संधी मिळू शकते तर दुसरीकडे अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याने मला संयुक्तपणे रौप्यपदक देण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र, या मागण्या करताना तिच्याकडून चूक झाली.

यामध्ये ऑलिम्पिक सुरु असताना या प्रकरणाचा निकाल लवकर लागायला हवा, अशी मागणी विनेशला करता आली असती. पण विनेशने ही मागणी केली नाही. क्रीडा लवादाने ही गोष्ट आपल्या पत्रकात स्पष्टपणे नमूद केली. या प्रकरणाचा निर्णय लवकर देण्यात यावा, अशी मागणी विनेशने केलेली नाही. जर ती मागणी केली असती तर या प्रकरणी लगेच चक्र हलली असती आणि या प्रकरणाचा निकाल लवकर लागू शकला असता. पण ही मोठी चूक झाल्याचे बोलले जात आहे.

विनेश ही एक खेळाडू आहे, तिला या तांत्रिक गोष्टी माहिती असतील, याची शक्यता फार कमी आहे. पण यावेळी ज्यांनी विनेशची याचिका दाखल केली, त्यांना हे नियम माहिती असणे गरजेचे होते. कारण जर या प्रकरणी तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी केली असती तर या प्रकरणाचा निकाल लवकर लागला असता. पण हे आता घडणार नाही. यापुढे विनेशच्या याचिकेवर जेव्हा तिचे मत मांडले जाईल, तेव्हा अजून काही चुका घडल्या तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यापुढे विनेशप्रकरणी कोणते पाऊल उचलले जाते, हे पाहावे लागणार आहे.

ऑलिम्पिक संपण्याआधी निर्णय देण्याचे संकेत
भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने ऑलिम्पिक समितीकडे दाखल केलेल्या याचिकेवर आज निर्णय अपेक्षित होता. मात्र, आता हा निर्णय पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा संपण्याआधी दिला जाईल, असे एका प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले. विनेशची बाजू मांडण्यासाठी भारताकडून अ‍ॅड. हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विनेश फोगट रौप्य पदकाची हकदार
विनेश फोगटसाठी आता सचिन धावून आला. प्रत्येक खेळ नियमांनुसारच खेळले जातात. विनेश पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण अंतिम फेरीपूर्वी वजन केले तेव्हा ती अपात्र ठरली. त्यामुळे ती रौप्यपदकाची हकदार आहे. विनेशने उत्तेजक द्रव्याचे सेवन केले असते तर तिला अखेरचा क्रमांक दिल्यास चालले असते. परंतु ती विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचली. त्यामुळे तिला रौप्यपदक मिळायला हवे, तिच्यासाठी आपण प्रार्थना करू या, असे सचिन तेंडुलकरने ट्विट करून म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR