ठाणे : प्रतिनिधी
शिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवार, १० ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात मेळावा आयोजित केला होता. मात्र या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील एका कारची काचही फोडली.
दरम्यान, पोलिस व ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना गडकरी रंगायतन सभागृहात नेले. त्यापाठोपाठ शिंदे गट व मनसेचे कार्यकर्ते सभागृहात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सभागृहाबाहेर तिन्ही पक्षांतील कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून हा राडा थांबवला. पोलिसांनी तिन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
यावेळी मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा कधी ठाण्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला.
दुस-या बाजूला शिंदे गटातील कार्यकर्ते देखील उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी देखील उद्धव ठाकरेंविरोधात घोषणा दिल्या. यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांवर बांगड्या फेकल्या.
अॅक्शनला रिअॅक्शन : मुख्यमंत्री शिंदे
ठाण्यातील हल्ला म्हणजे अॅक्शनला रिअॅक्शन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौ-यामध्ये झाली. त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरेंचा ताफा अडवला. शेवटी अॅक्शनला रिअॅक्शन असते. या हल्ल्याला माझे समर्थन नाहीच, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.