मुंबई : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या ठाणे महिला आघाडी प्रमुख आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अनिता बिर्जे यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
अनिता बिर्जे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून, बिर्जे त्यांच्या अनुभवी नेतृत्वात आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त केला.
यासोबतच शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता ताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालणा-या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.