ढाका : बांगलादेशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून बांगलादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेने उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत.
सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला ंिहसाचार आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. दरम्यान, आता लष्कराच्या जवानांवरही हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. गोपालगंज भागात लष्कराच्या वाहनावर जमावाने हल्ला केला आहे.
या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना गोळ्या लागल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या परतीच्या मागणीसाठी अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. रिपोर्टनुसार, अवामी लीगचे हजारो नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी आंदोलकांनी ढाका-खुलना महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान, लष्कराचे वाहन तेथे पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना रस्ता खुला करून आंदोलन थांबवण्याचं आवाहन केले. मात्र जमावाने त्यांच्यावर विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला.
प्रत्युत्तरात, आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली आणि गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी या घटनेची पुष्टी केली. जवळपास ३००० ते ४००० लोक जमले होते आणि त्यांनी रस्ता अडवला होता असे मकसूदुर रहमान यांनी सांगितले. तर गोपीनाथपूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. एका मुलासह दोन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.
दरम्यान, बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, आसाम पोलिस भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत, जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू नये. पोलीस महासंचालक जी.पी. सिंग म्हणाले की, बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.