23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयअनंतनागनंतर किश्तवाडमध्ये चकमक सुरूच

अनंतनागनंतर किश्तवाडमध्ये चकमक सुरूच

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागनंतर, रविवारी किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार बटम ब्रिजवर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अधिका-यांनी सांगितले की, आज सकाळी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. शोधमोहिमेदरम्यान दोन्ही बाजूंनी काही वेळ गोळीबार झाला.

नौनट्टा, नागेनी पायस आणि आसपासच्या भागात लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस कारवाई करत आहेत. या भागात अधिक सुरक्षा दल पाठविण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. एक दिवस आधी शनिवारी (१० ऑगस्ट) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा शहीद झाले होते. ३ सैनिक आणि २ नागरिक जखमी झाले. अनंतनागमध्येही सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवादी डोडा येथून अनंतनाग परिसरात घुसल्याचे समजते. जिल्ह्यातील कोकरनाग शहरात १०,००० फूट उंचीवर ही कारवाई सुरू आहे. येथे दाट झाडी असून मोठे दगडही आहेत. येथे दहशतवादी लपले आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी
शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी ४ दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले. कठुआ जिल्ह्यातील मल्हार, बानी आणि सोजधरच्या ढोकमध्ये ते शेवटचे दिसले होते. दहशतवाद्यांची माहिती देणा-याला पोलिसांनी ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात या दहशतवाद्यांचा हात आहे.

कुपवाडा येथे २ दहशतवादी मारले गेले
१७ जुलै रोजी कुपवाड्यातील केरन भागात लष्कराने दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले होते. लष्कराला येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. याशिवाय दोडा येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR