27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी ५ हजार

सोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी ५ हजार

जळकोट : ओमकार सोनटक्के
राज्य सरकारने गतवर्षी झालेल्या नुकसानीमुळे राज्यभरातील कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतक-यांंना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. आता या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून जळकोट तालुक्यामध्ये २५४६७ सोयाबीन उत्पादक शेतकरी असून तालुक्यामध्ये २११८ कापूस उत्पादक शेतकरी आहेत अशा एकूण जळकोट तालुक्यातील २७५८५ शेतक-यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे .
कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्याकिंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप  हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रुपये तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर ५,००० रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दि.११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती .
   राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रुपये तर ०.२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर  ५,००० रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.  राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांंनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी अ‍ॅप/पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील. ई-पीक पाहणी अ‍ॅप/पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार आहे
सदर शेतक-यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लींक्ड बैंक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे .  सदर योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठीच हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. वैयक्तिक खातेदार  शेतक-यांंना सदरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी साठीआधार कार्ड स्वत: स्वाक्षांकित केलेले झेरॉक्स प्रत ‘संमती पत्र, मोबाईल क्रमांक आवश्यक आहे तर सामूहिक खातेदार शेतक-यांसाठी आधार कार्ड स्वत: स्वाक्षांकित केलेले झेरॉक्स प्रत, सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र, संमती पत्र,  मोबाईल क्रमांक आवश्यक सदर पात्र शेतकरी बांधवाची यादी तालुका कृषि अधिकारी जळकोट कार्यालयास प्राप्त झालेली आहे
येत्या १ ते २ दिवसांत  सर्व ग्रामपंचायत सूचना फलकावर लावण्यात येणार असून . या व्यतिरिक्त काही अडचण असल्यास आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा , तसेच सर्व कागदपत्रे आपल्या गावच्या कृषी सहायकाकडे जमा करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR