छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळाने जालना-जळगाव मार्गासाठी हिरवा कंदील दाखवून निधीची तरतूद केली आहे. यावरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा आमने-सामने आले असून श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. या रेल्वेमार्गासाठी आपण पाठपुरावा केला, असे माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होतं. तर, रेल्वेमार्गाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, समीर काझी यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन जालन्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर उपस्थित होते. याच प्रसंगी बोलताना अब्दुल सत्तार यांनी रेल्वेबाबत केलेल्या दाव्यामुळे दोन्ही पक्षांत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
तीन दिवसांपूर्वी रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा झाली होती. यानंतर आपल्या कार्यकाळात रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.
यानंतर शनिवारी अब्दुल सत्तार यांनी रेल्वे मार्गाचे श्रेय मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार मुख्यमंत्री शिंदे आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमार्गासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.
सत्तार-दानवे वाद पुन्हा उफाळणार?
गेली तीस-पस्तीस वर्षांपासून रावसाहेब दानवे आणि सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील मैत्री लोकसभेला तुटली. सत्तार यांनी उघडपणे दानवे यांच्याविरोधात काम करत काँग्रेसच्या कल्याण काळे यांना मदत केल्याचे कबूल केलं. यानंतर अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड पाकिस्तान बनले आहे. अशा आरोपांचा भडिमार दानवे यांनी केला होता. यातच रेल्वे मार्गामुळे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा तू-तू.. मै-मै रंगण्याची शक्यता आहे.