जयपूर : जगभरात नुकताच मैत्री दिवस साजरा झाला. त्याच्या आठवडाभरानंतर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये बंधा-यावरील पाण्यात डुंबायला गेलेल्या पाच मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. एका मित्राला वाचविण्यासाठी हे पाचजण प्रयत्न करत होते, तो बुडणारा मित्र वाचला परंतू वाचवायला गेलेले ते पाच जण मात्र बुडाले आहेत.
रविवारी विकेंडला हे सर्वजण मौजमस्ती करण्यासाठी गेले होते. राजस्थानमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. कानोता बंधा-यावरून पाणी वाहत आहे. या बंधा-यावर सहा मित्र वाहणा-या पाण्याचा आनंद घेत होते. यापैकी एकाचा पाय घसरला व तो बंधा-याच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता पाचही मित्रांनी उडी मारली पण घडले भलतेच. परंतू, काळाने या पाच जणांवर घाला घातला. हे पाचही जण पाण्यात बुडाले. या घटनेचा इतर व्हीडीओ बनवत होते. राज ब्रिजवासी नावाच्या तरुणाचा पाय घसरल्याने तो बंधा-यातील पाण्यात बुडत होता. त्याला बुडताना पाहून राजचे इतर ५ मित्र हर्ष नागौरा, विनय मीना, विवेक माहोरे, अजय माहोरे आणि हरकेश मीना यांनी त्याला वाचवण्यासाठी उडी घेतली. परंतू राजने कसाबसा पोहत येऊन जीव वाचविला. परंतू, त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारणारे पाच मित्र बुडाले.
एसडीआरएफ आणि नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत बचाव मोहीम राबवत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. जयपूरच्या शास्त्रीनगर आणि झोटवाडा येथील हे सर्वजण रहिवासी आहेत. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली.