22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपराभवाच्या भीतीमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेला आघाडीचा विरोध

पराभवाच्या भीतीमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेला आघाडीचा विरोध

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप महिला मोर्चातर्फे फडणवीस यांना २५ लाख राख्या पाठवणार

मुंबई (प्रतिनिधी) : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील २५ लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या पाठवणार आहेत, अशी माहितीही बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या १७ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजना ही कायमस्वरुपी योजना असून महिलांनी या १८ हजार रुपयांमधील किमान ३ हजार रुपयांचा विमा जरी उतरवला तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच मिळू शकेल इतकी ताकद या योजनेत असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार करत उद्धव ठाकरे यांनी महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. करोडपतींच्या घरात जन्माला आलेल्यांना या योजनेचे मोल कळणारच नाही. महिला वर्गासाठी उपयुक्त योजनेची खिल्ली उडवून उद्धव ठाकरे यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस आणि सहका-यांचे सरकार असलेल्या कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहलक्ष्मी योजनेचे आश्वासन देऊन मते घेतली आणि सत्ता आल्यानंतर योजना बंद केली. जनतेशी अशी लबाडी करणा-यांना लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही. लबाड पार्टीसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना या योजनेत पण लबाडीच दिसते यात काही नवल नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

मध्य प्रदेश सरकारचे उदाहरण देत बावनकुळे यांनी भाजपा आणि सहका-यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतपेढी वर लक्ष ठेवून योजना घोषित न करता कायमस्वरुपी योजना राबवल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्नाटक आणि मध्य प्रदेश या २ राज्य सरकारांमधील फरक मांडत येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात जनता भरभरून मते देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील ४२ लाख शेतक-यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे बावनकुळे यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR