23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमातोश्रीबाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्र्यांचे सुपारीबाज लोक

मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्र्यांचे सुपारीबाज लोक

संजय राऊत यांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकावरील चर्चेच्या वेळी खासदार गैरहजर राहिल्यामुळे मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माणसे होती. पैसे देऊन, सुपारी देऊन त्यांना पाठवण्यात आले होते, असा आरोप करताना, त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची छायाचित्रेच खा. संजय राऊत यांनी आज बाहेर काढली. आंदोलनात सहभागी झालेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबतचे फोटो राऊत यांनी माध्यमांसमोर दाखवले.

गेल्या आठवड्यात वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आले. या वेळी काँग्रेस, समाजवादी पार्टीसह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला; पण शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व ९ खासदार नेमके या वेळी उपस्थित नव्हते त्यामुळे मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर आंदोलन केले. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुस्लिम कार्यकर्त्यांचे छायाचित्र दाखवत ते लोक मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठवले होते, असा दावा केला. मातोश्रीबाहेर १०-२० लोकं आले आणि घोषणाबाजी करून गेले.

अद्याप या कायद्यातील सुधारणांवर संसदेत चर्चा व्हायची आहे. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी गेलेले आहे. त्या समितीत सर्वपक्षीय लोकं असतात. त्यात चर्चा होईल; पण त्या आधीच मुंबईतील आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी मिंधे गटाच्या लोकांनी मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोकं पाठवली. मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सलमान शेख, अफरात सिद्दीकी, इलियास शेख, अकरम शेख, झिशान चौधरी, इम्रान शेख, अकबर सय्यद यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबतचे फोटो राऊत यांनी माध्यमांसमोर दाखवले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही माणसे होती. पैसे देऊन, सुपारी देऊन त्यांना पाठवण्यात आले होते. सुपारीचे सगळे खेळ सध्या वर्षा बंगल्यावर, मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून चालत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. ठाण्यात भगवा सप्ताहनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती काळोखातून काही फेकण्याचा प्रयत्न केला. हेदेखील यांचीच लोकं आहेत, असे सांगत सगळे बाहेरून आणलेले सुपारीबाज लोकं होते, असा आरोप करत २ महिन्यांनतर सत्ताबदल झाल्यावर तेव्हा बघून घेऊ, असा इशाराही राऊत यांनी दिला.

उद्धव ठाकरेंसोबतही फोटो
संजय राऊत यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आमच्या आंदोलनाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे, अशी भूमिका इलियास शेख यांनी मांडली. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला वाटते की मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढावा. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी कोणत्याच सोशल मीडियावर कार्यरत नाही. उद्धव ठाकरेंना फक्त संदेश द्यायचा होता म्हणून आम्ही ते आंदोलन केले. माझ्या सोबत अनेक कार्यकर्ते होते. आम्ही शांततापूर्वक आंदोलन केले, कोणतीही हिंसक कृती केलेली नाही. आम्ही कोणाबद्दल वाईट शब्दही काढलेले नाहीत, अशी भूमिका इलियास शेख यांनी मांडली तर आणखी एका कार्यकर्त्यांने या वेळी उद्धव ठाकरे व राजन विचारे यांच्या सोबत असलेले फोटोही दाखवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR