लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत. त्यांना नौकरी न मिळाल्यामुळे ते आत्महत्या करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला नोकरीसाठी आरक्षणांची नितांत गरज आहे. महाराष्ट्रात विधान सभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण न दिल्यास मराठा समाजातील तरूण नक्षलवादी बनून सरकारला धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या मराठा जोडो यात्रेच्या प्रसंगी लातूर आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने दि. ९ ऑगस्ट पासून तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेवून मराठा जोडो यात्रा सुरू केली आहे. मराठवाडाभर सदर यात्रेच्या माध्यमातून बैठका, सभा घेवून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठवाडा पिंजून काढला जाणार आसल्याचे सांगून जावळे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय १९८० पासून धगधगता आहे.
संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जावळे पाटील यांनी महाराष्ट्रातच नाहितर, महाराष्ट्राच्या लगत असलेल्या राज्यात मराठा समाजासाठी व शेतक-यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत सर्व समाज घटकांना घेवून लढा दिला. मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चो निघाल्यानंतर फडणवीस सरकारने मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते कोर्टात टिकले नाही. तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणे बंद झाले, एसईबीसीच्या संदर्भाने काम बंद झाले आहे. जिथून मराठा आरक्षणाचा विषय पेटला त्याच मराठवाडयाच्या आरक्षणाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे भिमराव मराठे, बालाजी सुर्यवंशी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित
होते.