23.9 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रबांगलादेशातील हिंसाचाराचा संत्रा उत्पादकांना फटका

बांगलादेशातील हिंसाचाराचा संत्रा उत्पादकांना फटका

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतक-यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन केले जाते. बांगलादेशातून या संत्र्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
पण बांगलादेशातील हिंसाचारामुळे संत्र्यांची निर्यात पूर्णपणे रखडली आहे. त्यामुळे दर हंगामात बांगलादेशात होणा-या अडीच टन संत्र्यांच्या निर्यातीला फटका बसला असून शेतक-यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.

बांगलादेशातील परिस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे हिंसाचार उफाळून आला होता. मात्र या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. गेल्या काही वर्षांत बांगलादेशाने हिंदुस्थानातून येणा-या संत्र्यांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले होते. मात्र तरीही बांगलादेशातील संत्र्यांची मागणी कमी झाली नव्हती.

त्यामुळे शेतक-यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून संत्रा उत्पादनात वाढ केली. जेणेकरून यावर्षी देखील संत्र्यांचा दुप्पट प्रमाणात खप होईल. पण आता बांगलादेशातील अराजक स्थितीमुळे एकही व्यापारी बांगलादेशात संत्रा घेऊन जायला तयार नाही.

कोणताही व्यापारी बांगलादेशात जाण्यास तयार नसेल तर बांगलादेशला निर्यात होणा-या अडीच लाख टन संत्र्यांचे यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात संत्रा बाजारात येण्यास सुरुवात होईल. शेतक-यांनाही चांगल्या उत्पन्नाची आस आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतक-यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR