मुंबई : बोगस भारतीय पासपोर्टवर सौदी अरेबियाला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका बांगलादेशी तरुणाला सहार पोलिसांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले. मोहम्मद ओसमान किरमतअली बिस्वास (२५) असे या बांगलादेशी तरुणाचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
सूत्रांच्या मते, आरोपी मोहम्मद ओसमान हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून तो सध्या पुण्याच्या वाकड भागात राहत होता. शनिवारी तो सौदीला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता.
त्याच्या बोली भाषेवरून इमिग्रेशन अधिका-र्यांना संशय आला. यानंतर अधिका-यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. तेरा वर्षांपूर्वी तो त्याच्या मामासोबत बांगलादेशातून भारतात आला होता, असे त्याने सांगितले. दरम्यान कालच पुणे विमानतळावर बनावट तिकिटाच्या आधारे प्रवास करण्याचा प्रयत्न करणा-या दोन तरुणांना अटक करण्यात आले होते