नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इशान किशन ब-याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याला बीसीसीआयकडून अनेकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तो फक्त आयपीएलमध्ये खेळला. आता कदाचित ईशानने आपला मूड बदलला असून, झारखंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो बुची बाबू ट्रॉफीमध्ये खेळणार असून, तो झारखंड संघाचे नेतृत्व करणार आहे. बुची बाबू ट्रॉफी २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. इशानकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने यापूर्वी अंडर-१९ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. इशान सध्या भारतीय संघा बाहेर असल्यामुळे त्याला पुनरागमन करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इशान किशनने झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या इराद्याबद्दल आधीच माहिती दिली होती. आता रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या मोसमातही त्याची खेळण्याची शक्यता वाढली होती. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यानंतर तो देशांतर्गत हंगामापासून दूर राहिला.
ईशान किशनचे रेड बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन अशा वेळी झाले आहे जेव्हा टीम इंडियाला येत्या काही महिन्यांत बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांविरुद्ध एकूण १० कसोटी सामने खेळायचे आहेत. आगामी देशांतर्गत हंगामात त्याने चांगली कामगिरी केल्यास त्याला टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान, इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौ-यातून आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर त्याने बीसीसीआयकडून ब्रेक मागितला होता. यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने पुनरागमन करण्यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, असे सांगितले होते. त्यावेळी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी झाला नव्हता. खरं तर, तो बडोद्यातील हार्दिक पांड्यासोबत क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. त्याला केंद्रीय करारातून काढून टाकण्यात आले.