गांधीनगर : गुजरात राज्यात कामगारांच्या वाढत्या आत्महत्येच्या प्रमाणामुळे इथल्या प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या इथे व्यवसाय मंदावल्याने कारागिरांना नोक-या गमवाव्या लागल्या होत्या, तर आता बड्या कंपन्या बरखास्त झाल्यामुळे ही परिस्थिती आणखी वाढली आहे. आत्महत्येचे पाऊल उचलू नये यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठ्या प्रमाणात कॉल आले आहेत. या हेल्पलाइनवर आतापर्यंत १६०० हून अधिक कॉल्स आले आहेत.
सध्याची स्थिती पाहता गुजरात राज्यातील सुरतमध्ये हि-यांचा व्यवसाय मंदावल्याने आणि मोठ्या कंपन्यांच्या लांबलेल्या सुट्ट्यांमुळे धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. डायमंड वर्कर्स युनियन गुजरातने १५ जुलै रोजी हेल्पलाइन नंबर सुरू केला होता. या हेल्पलाइनवर आतापर्यंत १६०० हून अधिक कॉल्स आले आहेत. ज्यामध्ये कारागिरांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. युनियनने शेअर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. किरण जेम्स या सुरतमधील हिरे बाजारातील सर्वात मोठ्या फर्मने श्रावण महिन्यात १० दिवसांची सुटी जाहीर केली आहे. तर जागतिक स्तरावर हि-यांची मागणी कमी असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे फर्मचे म्हणणे आहे.
डीडब्ल्यूयूजीचे उपाध्यक्ष भावेश टंक म्हणाले की, सुरतमध्ये गेल्या १६ महिन्यांत ६५ हिरे कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यापैकी बहुतेकांनी पगार कपात आणि नोकरी गमावल्यामुळे, त्यातच मंदीचा परिणाम म्हणून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणाले की, आम्ही १५ जुलै रोजी हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला होता. आम्हाला आतापर्यंत १,६०० हून अधिक कॉल आले आहेत, त्यापैकी अनेकांनी आर्थिक तणावामुळे आत्महत्या करण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांत बहुतेक कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांनाही रोजगार न मिळण्याची चिंता आहे.
व्यवसायावर वाईट परिणाम
जागतिक तणावाचा गुजरातमधील सुरतमधील हिरे व्यवसायावर वाईट परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांत व्यवसाय मंदावल्याने कारागिरांना नोक-या गमवाव्या लागल्या होत्या, त्यातच आता बड्या कंपन्या बरखास्त झाल्यामुळे ही परिस्थिती आणखी वाढली आहे. कारागिरांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठ्या प्रमाणात कॉल आले आहेत.
पगारकपात, नोकरीवरून काढले
ज्या लोकांच्या पगारात ३० टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे, मुलांच्या शाळेची फी, घरभाडे, घर आणि वाहन कर्जाचे मासिक हप्ते इत्यादी गोष्टी या पगारातून पुरवल्या जातात. युक्रेन-रशिया आणि इस्रायल-गाझा संघर्ष, तसेच प्रमुख बाजारपेठेतील चीनमधील कमकुवत मागणीमुळे जास्त पुरवठा झाला आहे, ज्यामुळे यावर्षी ५०,००० कामगारांना त्यांच्या नोक-या गमवाव्या लागल्या आहेत.
लहान युनिट्स बंद
धर्मानंदन डायमंड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, लहान डायमंड युनिट्स बंद झाल्यामुळे, काही ज्वेलर्सना त्यांच्या नोक-या गमवाव्या लागल्या आहेत, त्यामुळे कामगार त्यांच्या मुलांची शाळा आणि महाविद्यालयाची फी भरू शकत नाहीत. हिरे कामगारांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे, सूरत डायमंड वर्कर्स युनियनने अलीकडेच एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे, ज्यामध्ये अनेक कामगारांनी त्यांच्या मुलांची शाळा आणि महाविद्यालयाची फी भरण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.