28.5 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘अटल सेतू’ मुळे मासळीचे प्रमाण घटले

‘अटल सेतू’ मुळे मासळीचे प्रमाण घटले

मच्छिमारांचा आरोप, नुकसानभरपाईसाठी घेतली हायकोर्टात धाव

मुंबई : मुंबईला नवी मुंबईशी जोडणा-या ‘अटल सेतू’ मुळे चाकरमान्यांची चांगली सोय झाली असली तरी मासळीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या रोजगारावर त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत. याविरोधात मच्छिमार संघटनेने लढा पुकारला असून, मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मच्छिमारांनी या याचिकेत केली आहे. या याचिकेवर २८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

सूत्रांच्या मते, अटल सेतूमुळे वाशी खाडीतील ६० टक्के मासळी कमी झाल्याचा आरोप मच्छिमार संघटनेने केला आहे. त्यामुळे आमच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मच्छिमार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.
अटल सेतूचे काम २०१८ साली सुरू झाले होते आणि काम पूर्ण करून नागरिकांसाठी तो १२ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आला. मुंबई ते नवी मुंबई जोडणारा अटल सेतू हा २१.८ किमी लांबीचा पूल आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू झाल्यापासून मासेमारीत घट झाल्याचा दावा मच्छिमार संघटनांनी केला आहे.

मरी आई मच्छिमार संस्थेने दाखल केली याचिका
दाखल याचिकेमध्ये वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, दिवा आणि बेलापूर येथील कोळीवाड्यांचाही समावेश आहे. तर सदरची याचिका मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

रोजीरोटीवर परिणाम झाल्याचा मच्छिमारांचा दावा
अटल सेतू दक्षिण मुंबईला आणि नवी मुंबईला जोडतो. यामुळे मुंबईतील नागरिकांना अवघ्या २० मिनिटांत नवी मुंबईत पोहोचता येते. अटल सेतू हा २१.८ किमी लांबीचा ६ लेन रोड पूल आहे. त्याचा १६.५ किमी लांबीचा भाग मुंबईच्या समुद्राच्या बाजूला आहे आणि ५.५ किमी भाग जमिनीच्या बाजूला आहे. मासेमारी हा आमचा पारंपरिक व्यवसाय असून, तोच आमच्या उत्पत्तीचा स्रोत आहे. आम्ही अनेक वर्षांपासून मासेमारी करतो. मात्र, अटल पुलामुळे आमच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याचे मच्छिमार संघटनेने म्हटले आहे.

मासेमारीसाठी जाणा-या बोटींची संख्या घटली
याचिकेत दाखल केलेल्या अहवालात म्हटले की, २०१५-१६ च्या तुलनेत २०२०-२१ या कालावधीत मासळीत ५९.३४ टक्के घट झाली आहे. तर २०१९-२० हंगामात २०१७-१८ च्या तुलनेत माशात ६० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे आता मासेमारीसाठी जाणा-या बोटींची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. त्याचा थेट परिणाम मच्छिमारांच्या उत्पन्नावर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR