17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदेशभरातील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरूच

देशभरातील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरूच

केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू महाराष्ट्रातील ‘मार्ड’ही सामील

नवी दिल्ली : कोलकात्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर मंगळवार दि. १३ ऑगस्टपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळवले आहे. तसेच, या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच असतील असेही मार्डच्या वतीने सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफएआयएमए) ने मंगळवार दि. १३ ऑगस्टपासून देशव्यापी निषेध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ओपीडी आणि वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. याच निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेने आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणा-या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. हे काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.

एफएआयएमए च्यावतीने ट्विटरवर ट्वीट करण्यात आले आहे की, आम्ही भारतभर आंदोलन करणा-या डॉक्टरांच्या पाठीशी उभे आहोत! आम्ही देशभरातील डॉक्टरांना आजपासून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो! आम्हाला न्याय हवा आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी आयएमएने केली आहे. तसेच, असा गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. त्याचप्रमाणे, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची, विशेषत: महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही आयएमएच्या वतीनं करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?
शुक्रवारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका ३१ वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये अधिका-यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या.

काय आहेत मागण्या?
– केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
– संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये.
– तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.
– वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.
– रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावी, पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.
– एफएआयएमए डॉक्टर्स असोशिएशन

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR