पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने राज्य शासन पुरस्कार विजेत्या कथाकार विनिता ऐनापुरे आणि डॉ. रजनी शेठ यांच्या समग्र साहित्याची ओळख करून देताना अनुक्रमे अश्विनी रानडे व डॉ. समिता टिल्लू यांनी रसिकांसमोर अनेक पैलू उलगडले. निमित्त होते आचार्य प्र. के. अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे. यामध्ये साहित्यिकांच्या साहित्यावर भाष्य व संवाद तसेच विडंबन काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर अध्यक्ष विडंबनकार बंडा जोशी, प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश गुजर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, विनिता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, डॉ. समीता टिल्लू, अश्विनी रानडे उपस्थित होते. कथाकार ऐनापुरे आणि डॉ. शेठ यांच्या कथांमधील मर्म, भाषा संवाद, त्यातील स्त्री जाणीवा, भाषाशैली, उत्कंठा वाढवणारी मांडणी आदी बाबी भाष्यकारांनी सखोलतेने रसिक प्रेक्षकांसमोर मांडून त्यांच्या डोळ्यांसमोर कथेचे चित्र उभे केले.
विडंबन काव्य संमेलनात शोभा जोशी, मोहन जाधव, अनघा पाठक, चंद्रकांत धस, बाळकृष्ण अमृतकर, संध्या गोळे, हेमंत जोशी, मनीषा पाटील, दया करवीर, सुनील कोलते, सूर्यकांत भोसले, अनिता देशमुख आदी कवींनी आपल्या विडंबन कविता सादर करून रंगत आणली तर शेवटी बंडा जोशी यांनी सादर केलेल्या विडंबन कवितांनी कवी व उपस्थित रसिकांमध्ये हास्याचे फवारे उडाले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक तर संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.