सोलापूर:गेल्या तेरा दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या वृध्द भाजी विक्रेत्या महिलेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी खून करण्यात आल्याची घटना जोडभावी पेठ आणि शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगार व एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे.
साळुबाई नागेश वाघमोडे (वय ६०, रा. स्वागत नगर, एम आयडीसी, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून साळुबाई या भाजी विकण्याचे काम करीत होत्या. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नागेश येळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिपक साळुंखे (वय ४०, रा. जय मल्हार नगर, बाळे, सोलापूर) या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपक साळुंखे हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी शहर पोलिसांकडून तडीपार करण्यात आले होते. तो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो.
साळुबाई वाघमोडे यांचा भाजीपाला विक्रिचा व्यवसाय आहे. २५ जुलै २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास साळुबाई वाघमोडे या बाळीवेस येथील कस्तुरबा मार्केट येथे भाजी विकण्यासाठी आल्यानंतर कोणासही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. याबाबत अशोक नामदेव वाघमोडे यांनी साळुबाई यांचा सोलापूरात व नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे अशोक वाघमोडे तक्रारीवरून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात साळुबाई वाघमोडे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. साळुबाई या झाल्याने जोडभावी पेठ तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्याचाशोध चालू होता.
शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दिपक साळुंखे यास ताब्यात घेतले व चौकशी केली. त्यावेळी साळुबाई वाघमोडे यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी त्यांचा गळा दाबून साळुंखे याने खून करून मृतदेह लांबोटी येथील सिना नदीच्या पुलावरून नदी पात्रात टाकून दिल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.