नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात वाढती महागाई आणि जागतिक मागणी तसेच दुसरीकडे भूराजकीय आव्हानांमुळे तेढ निर्माण झाल्याचे चित्र असताना भारताची निर्यात वाढल्याचा अंदाज उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने वर्तवला आहे. भारताची जुलै महिन्यातील निर्यात ही २.८१ टक्क्याने वाढल्याचे सांगण्यात आले असून गेल्यावर्षी याच महिन्यात ६०.७१ अब्ज होती. ती आता ६२.४२ अब्ज झाली आहे. या वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यांत भारताची एकूण निर्यात जवळपास २६० अब्ज डॉलर इतकी झाली होती. यावर्षीचे निर्यात लक्ष्य ८०० अब्जपर्यंत गाठण्याचा आशावाद सरकारने व्यक्त केला.
एप्रिल ते जुलैदरम्यान व्यापारी वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य १४४.१२ अब्ज डॉलर्स होते. मागील वर्षीच्या तुलनेत यात ४.१५ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्सने एप्रिल २०२५ पर्यंत जागतिक व्यापारात हळूहळू वाढ होईल. २०२३ मध्ये ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमती आणि प्रगत अर्थव्यवस्थांमधील चलनवाढ यांच्या दीर्घकाळ परिणामांमुळे मागील ४ महिन्यांत निर्यात आकुंचन पावली होती. त्यात आता वाढ होत असल्याने दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
देशातील नॉन पेट्रोलियम उत्पादनांमध्ये आणि दागिन्यांच्या निर्यातीत मागील वर्षापेक्षा वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले. मागील वर्षी ही निर्यात २५.४७ बिलियन होती. ती आता २६.९२ बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांनंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यात वाढली आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात ही २०२३ मधील निर्यातीपेक्षा तब्बल ३७.३१ टक्क्यांनी वाढली आहे. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यातही ३.६६ टक्क्यांनी वाढून ९.४ बिलियन डॉलर इतकी झाली आहे.
मांस, दूध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
देशातील मांस, दूध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत ही थोडीशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ किरकोळ असली तरी ०.२९ बिलियन डॉलरवरून ०.४६ बिलियन डॉलर इतकी झाली आहे. देशाने २०३० पर्यंत २ लाख कोटी डॉलरवर निर्यात नेण्याचे लक्ष निश्चित केले आहे.