मुंबई : मुंबईत गेल्या १५ दिवसांत पावसाळी आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डासांमुळे होणा-या डेंग्यू, मलेरिया आणि चिकूनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यामुळे नागरिकांनी घरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
चिकूनगुनिया आणि डेंग्यू हे आजार एडिस डासांमुळे होतात. अधूनमधून होणा-या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून एडिस डासांची उत्पत्ती होते. तर अॅनाफिलिस मादी जमातीच्या डासांमुळे मलेरिया आजार होतो. गेल्या काही दिवसांत नागरिकांमध्ये फ्लूची लक्षणे आढळून येत असल्याने फॅमिली फिजिशियनकडे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे बहुतांश पावसाळी आजारांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी दिसून येत आहे. त्यामुळे काही नागरिक थेट रक्तचाचणी करण्यासाठी डॉक्टरांकडे आग्रह धरत आहेत.