कल्याण : प्रतिनिधी
कल्याण तालुक्यातील वरपगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर आता वरप येथेही बॅगेत मृतदेह आढळला आहे. एका अज्ञात व्यक्तीचा मृतेदह बॅगेत भरून कचराकुंडीत फेकून देण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वरप परिसरातील गावदेवी मंदिर भागात स्थानिकांना ही बॅग दिसली होती. त्यानंतर रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ही बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांनादेखील धक्काच बसला. या बॅगेत एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह होता. अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
वृद्ध व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही बॅग कच-यात फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कल्याण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या संदर्भात तात्काळ तपास सुरू केला आहे. तर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी आणि डॉग स्कॉडने हा परिसर पिंजून काढला आहे. अंगाने मध्यम बांधा असलेल्या सावळ्या रंगाच्या या वृद्धाची उंची साधारण ५ फूट ५ इंच इतकी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, या वृद्धाच्या परिचितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहनदेखील करण्यात आले आहे.
पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही सुटकेस कोणी टाकली याचा शोध घेतला जात आहे.