23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमहंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्या

महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्या

वैजापुरात तीन दिवस जमावबंदी

छत्रपती संभाजीनगर : सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या वक्तव्यातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या वक्तव्याचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे वैजापूर येथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने वैजापूरमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हीडीओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हीडीओमुळे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

एक गट वैजापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमला होता. यावेळी जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रस्त्यावर येऊन टायर देखील जाळले. अचानक एवढा मोठा जमाव रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांना सगळा बंदोबस्त लावावा लागला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विनायक कुमार राठोड यांनी तातडीने या घटने संबंधित व्हीडीओ कोणीही व्हायरल करू नये, जे कोणी हे व्हीडीओ व्हायरल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. कुणीही पोस्ट व्हायरल करू नये किंवा सोशल मीडियावरील व्हायरल होत असलेल्या व्हीडीओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात उपविभागीय अधिका-यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. १६ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजल्यापासून १९ ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. वैजापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी शांतता राखावी, अफवा पसरवणारे प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करू नयेत, तसेच गैरसमज करणारे संदेशही पाठवू नयेत, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR