ढाका : संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचे एक पथक पुढील आठवड्यात बांगलादेशला भेट देणार आहे. येथे ही टीम पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यापूर्वी आणि नंतर झालेल्या निदर्शकांच्या हत्यांची चौकशी करेल. गुरुवारी संघाच्या बांगलादेश दौ-याची घोषणा करण्यात आली. एका अधिका-याने सांगितले की, १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रसंघाचे पथक मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी बांगलादेशात जाणार आहे.
८ ऑगस्ट रोजी, शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर सुरू झालेल्या हिंसाचारादरम्यान, मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. बांगलादेशमध्ये जुलैमध्ये आणि या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र पुढील आठवड्यात एक तपास पथक पाठवत आहे, अशी माहिती मोहम्मद युनूस यांनी एक्सवर पोस्ट करून दिली. संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी बुधवारी उशिरा मोहम्मद युनूस यांना फोन करून मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी एक टीम बांगलादेशात येणार असल्याचे सांगितले.