राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू असून त्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींवर सह्या करण्यावरून मोठा वाद झाल्याचे बोलले जाते. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाल्याने ‘सही रे सही’चे नाट्य रंगल्याचे सांगितले जाते. या दोघांच्या ताठर भूमिकेमुळे मंत्रिमंडळ बैठकीत काही मिनिटे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्या आहेत म्हणे. शिवभोजन थाळीचा वाढीव प्रस्ताव आणि यासारख्या १८ ते २० महत्त्वाच्या फाईल्स अडकल्या आहेत.
त्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. सत्तेत तीन पक्ष एकत्र आल्याने पुन्हा एकदा निधी वाटप विभागाच्या फाईल्सवरून वाद वाढला आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडविण्यात आल्याने अजित दादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईली वाचल्याशिवाय सही करायची नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याचे दिसते. मुख्यमंत्री कार्यालयात फाईल्स अडविल्या जात असल्याने अजित दादांचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवार या दोघांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंत्रिमंडळ बैठकीत काही मिनिटे तणाव निर्माण झाला. मात्र हा विषय संपल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आयत्यावेळी विषय आले तर काय करायचे, किमान वाचायला वेळ तरी मिळाला पाहिजे अशी अजित पवारांची भूमिका होती तर तुमच्याकडून आलेल्या फाईलवर मी सह्या करत नाही का असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे होते.
हा विषय ठरवून आयत्यावेळी आणला नाही तर तो अचानक समोर आल्याने विषय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा वाद सुरू असताना शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत अजितदादांवर भडकले. माझ्या विभागाच्या फाईलींवर तुम्ही निर्णय का घेत नाही असा सवाल करत त्यांनी अजितदादांना टार्गेट केले. ही फाईल माझ्या हिताची नसून लोकांच्या हिताची आहे असे सांगत सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी धडपड करीत आहेत. सत्तेत तीन पक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटप, विभागाच्या फाईल्स यावरून वादाला तोंड फुटले आहे. या आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष होते. त्यावेळी अजित पवार निधी देत नाहीत या कारणावरून शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते आणि महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले होते. आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि वित्त व नियोजन खातं त्यांच्याकडे होतं.
महायुती सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि वित्त व नियोजन विभागही त्यांच्याकडे आहे. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. कारण मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. महायुतीतील धुसफुशीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, अजितदादाला तिकडे जाऊन दीड वर्ष लोटलं. अनेक योजना त्यांनी सह्या करून मान्य केल्या. दादांनी अशी भूमिका घेतली म्हणजे यापूर्वीच्या योजना इतरांच्या दबावाखाली मंजूर केल्या का? दादा आता खरं मत व्यक्त करायला लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याशी पंगा घेऊन ‘फाईल वॉर’ सुरू केल्याने शिवसेना-अजित पवार यांच्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महायुतीत तिसरा भिडू आल्याने आधीच नाराज झालेल्या शिंदे गटाने आता बाह्या सरसावल्याचे मानले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शिंदेंचे मंत्री आणि अजित पवारांचे मंत्री एकमेकांवर मोठ्या आवाजात आरोप-प्रत्यारोप करत असल्याने हा वाद चांगलाच रंगल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला जोरदार फटका बसल्याने कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला घवघवीत यश मिळवायचे, यासाठी शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने चंग बांधला आहे. त्यासाठी नवनवीन योजना आणून विविध घटकांना खुश करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात जास्तीतजास्त निधी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. अलिकडे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केल्यानंतर कोणत्याही पद्धतीने या योजनेसाठी पैसे उभे करण्याचे आव्हान अजित दादांनी पेलले आहे. या योजनेसाठी बराच पैसा खर्च होणार असल्याने अन्य योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या योजनांची घोषणा होण्याआधी अनेक आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात जाऊनही त्याला मंजुरी मिळत नसल्याची खदखद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे. त्यातूनच ‘सही रे सही’ नाट्य रंगले आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा जिंकता आल्यामुळे महायुतीतील जवळपास सर्वच पक्ष त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांकडून अजित पवार गटाची कोंडी केली जात आहे. अजित दादांच्या सहीनंतर फाईलवर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही लागते. म्हणजे एकमेकांच्या फाईल अडवून आपली कामे कशी पुढे रेटली जातील असा प्रयत्न केला जात आहे. हा सारा ‘सही रे सही’ नाट्याचा परिपाक आहे.