नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय कुस्तीपटूंचा मोठा विजय झाला आहे. विनेश फोगटसह भारताच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध आवाज उठवला होता. त्यावेळी आंदोलन करणा-या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाईची मागणीही केली होती. आता दिल्ली उच्च न्यायालयाने ब्रिजभूषण सिंग यांना मोठा धक्का देत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक रद्द ठरवली आहे. त्यामुळे आंदोलन करणा-या भारतीय कुस्तीपटूंचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे.
ब्रिजभूषण यांना त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या संजय सिंग यांना अध्यक्षपदाच्या रिंगणार उतरवले. त्यानंतर निवडणुकीत संजय सिंग विजयी झाले. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्या जवळची व्यक्तीच भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाली होती. यावरून उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या याचिकेवर आज निकाल देण्यात आला असून, यात न्यायालयाने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडच रद्द ठरवली. अर्थात निवडणूकच रद्द ठरवल्याने आता संजय सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर राहता येणार नाही. संजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीच बरखास्त केली. त्यामुळे आता अस्थाई समितीच भारतीय कुस्तीबाबत निर्णय घेऊ शकणार आहे.