18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमविआने रणशिंग फुंकले

मविआने रणशिंग फुंकले

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो : ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. विधानसभेतील लढाई ही महाराष्ट्रधर्म रक्षणाची, महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्याची आहे, असे सांगत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आघाडीच्या मेळाव्यात बोलताना फुंकले. याच वेळी ‘ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री’, या सूत्रामुळे अनेकदा पाडापाडीचे राजकारण होते. तसे झाले तर मग आघाडीला काय अर्थ राहील, त्यामुळे आधीच ठरवा आणि मग पुढे जा. शरद पवार, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मात्र, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने त्याला तूर्त तरी बगल दिल्याचे दिसून येते.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा संयुक्त पदाधिकारी मेळावा आज पार पडला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, खा. संजय राऊत, जयंत पाटील, शेकाप नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या वेळी महायुतीविरुद्ध लढाईचे रणशिंग फुंकतानाच आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले जात नसल्याने दुखावलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी आम्ही तयार आहोत, असे सांगतानाच, आगामी लढाई वाट्टेल तेवढी सोपी नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे? उद्धव ठाकरे की आणखी कोण? अशा चर्चा सुरू आहेत. मी माझ्यासाठी लढत नाही. मुख्यमंत्री पद मी क्षणात सोडले होते आणि पुन्हा लढतोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय. विधानसभा निवडणुकीत ज्याच्या जास्त जागा निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री हे धोरण महाविकास आघाडीमध्ये नको. भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये असताना जो अनुभव घेतलाय तो आता नको. त्यावेळी जागावाटपासाठी बैठका व्हायच्या आणि ज्याच्या जास्त जागा येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे ठरवले जायचे; परंतु त्या धोरणामुळे मग एकमेकांच्या पायावर धोंडे घातले जायचे. पाडापाडीचे राजकारण व्हायचे. तसे झाले तर मग युतीला काय महत्त्व राहिले? म्हणून आधी ठरवा आणि मग पुढे जा; पण या धोरणाने जाऊ नका, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी मांडली.

भाजपाच्या राजवटीत देशात हिंदू-मुस्लिम आणि महाराष्ट्रात समाजासमाजात आगी लावल्या जाताहेत. लोकसभा निवडणुकीत केवळ मुस्लिम समाजानेच नव्हे तर बौद्धांनी, मराठी माणसांनी, हिंदूंनी शिवसेनेला भरभरून मतदान केले, असे ठाकरे म्हणाले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, जयंत पाटील, शेकाप नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांचीही भाषणे झाली.

त्यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका
गद्दार, तोतयांनी शिवसेना चोरली; पण या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरले असले तरी त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. लोकसभेला मशालीचा प्रचार करायला वेळ कमी पडला तरीही यश मिळवले. राष्ट्रवादीचाही पक्ष आणि निशाण चोरले. काँग्रेसच्या नशिबाने अजून त्यांचा हात कायम आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारी वाजवणारा मावळा गावागावात घराघरात पोहोचवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मोदीजी हिंदुत्व सोडले का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सेक्युलर संविधान, सेक्युलर सिव्हिल कोडवर बोलले. त्या वरून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, सेक्युलर सिव्हिल कोडवर बोलता मग तुम्ही हिंदुत्व सोडले का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत वक्फ बोर्ड, देवस्थानाच्या जमिनी लाटू देणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

आरक्षण मर्यादा वाढवा, आम्ही पाठिंबा देतो
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहारने वाढवलेली मर्यादा कोर्टाने फेटाळली. हा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे अन्यथा राष्ट्रपती ते करू शकतात. त्यामुळे मराठा आरक्षणाचे बिल लोकसभेत आणून आरक्षणाची मर्यादा वाढवा. ओबीसींचे आरक्षण तसेच ठेवा, धनगरांना आणि सर्वांना आरक्षण द्या. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी-शहांचे एटीएम बंद करू : नाना पटोले
भाजपकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव करून मोदी-शहांचे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पन्नास खोके पुन्हा विधानसभेत नको : राऊत
महाविकास आघाडीने एकीच्या बळावर लोकसभा जिंकली. हीच एकी विधानसभेतही कायम ठेवायची आहे, असे सांगतानाच, पन्नास खोके पुन्हा विधानसभेत दिसता कामा नयेत आणि निवडणुकीनंतर तर रस्त्यावरही दिसता कामा नयेत, असे आवाहन या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

अजित पवार गुलाबी सरडा
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. त्यांच्यासाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढला, असे सांगत संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्या लाडक्या भावाने सध्या रंग बदलला आहे. ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो; पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो? हा पिंक सरडा आता बारामतीही सोडणार, असे ऐकतोय. गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, असा टोला खा. राऊत यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR