नवी दिल्ली : सध्या सर्व संघ आयपीएल २०२५ च्या तयारीत व्यस्त असताना पंजाब किंग्जच्या मालकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत. एवढेच नाही तर प्रीती झिंटा आणि मोहित बर्मन यांच्यात काही मुद्यांवरून वाद सुरू असून हे प्रकरण चर्चेतून बाहेर गेल्याचे वृत्त आहे. परिणामी, आता प्रीतीने सह-मालक मोहित बर्मनला त्याच्या शेअर्सचा काही भाग दुस-याला विकण्यापासून रोखण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
प्रीती झिंटाच्या कोर्टात जाणा-या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रीतीला थेट कोर्टात जावे लागले असे काय घडले हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. खरे तर मोहित बर्मन यांच्याकडे पंजाब किंग्जचे सर्वाधिक शेअर्स आहेत.
अशा परिस्थितीत त्याला ११.५ टक्के शेअर्स कुणाला तरी विकायचे आहेत. पण प्रीती झिंटाचा याला पूर्ण विरोध आहे. त्याला त्याचे शेअर्स कोणाला विकायचे आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही. रिपोर्टस्नुसार, बर्मन यांनी सांगितले की, त्यांना त्यांचे शेअर्स विकण्याचा कोणताही विचार नाही. त्याचवेळी प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंजाब किंग्जचे कोणाकडे किती शेअर्स आहेत?
दरम्यान, आतापर्यंत आयपीएलमधील पहिल्या ट्रॉफीच्या दुष्काळाशी झुंजत असलेल्या पंजाब किंग्ज संघाचे शेअर्स ४ भागात विभागले गेले आहेत. संघाचे सर्वाधिक शेअर्स मोहित बर्मन यांच्याकडे आहेत, ज्यांच्याकडे ४८ टक्के शेअर्स आहेत. प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्याकडे २३ टक्के शेअर्स आहेत. उर्वरित समभाग चौथा मालक करण पॉल यांच्याकडे आहेत. ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, प्रीतीने लवाद आणि सामंजस्य कायदा-१९९६ च्या कलम ९ अंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप बॉलिवूड अभिनेत्रीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.