नाशिक : प्रतिनिधी
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर रामगिरी महाराजांना थेट पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकसह छत्रपती संभाजीनगरात तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. ज्या रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
या सप्ताहात मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील हजेरी लावली.
आज नाशिक जिल्ह्यातील पांचाळे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. वादग्रस्त वक्तव्य करणा-या रामगिरी महाराजांची सुरक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर वाढवण्यात आली आहे. रामगिरी महाराजांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रवचनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.