कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कोल्हापुरात आईच्या निधनानंतर सख्ख्या बहीण-भावाने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. दोन्ही बहीण-भावांचे मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलिसांनी सुरू केला आहे.
आईच्या निधनानंतर मानसिक धक्का बसलेल्या सख्ख्या बहीण-भावाने कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना काहींना आढळले होते. ६१ वर्षीय भूषण निळकंठ कुलकर्णी आणि ५७ वर्षीय वकील भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही अविवाहित होते.
आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून आईचा विरह सहन न झाल्याचे कारण समोर आले आहे. या दोन्ही उच्चशिक्षितांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुलकर्णी बहीण-भावाने नागपूर, सोलापूर, मुंबई, पुणे इथल्या अनाथ मुलांसाठी काम करणा-या संस्था, पाळणाघर बांधकामासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. आत्महत्येपूर्वीच आईच्या नावाने संपत्ती दान केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.