कोलकाता : कोलकाता येथील एका सरकारी रुग्णालयात ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेवरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. याच दरम्यान सीबीआयचा तपासही सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांनी ट्रेनी डॉक्टरच्या तीन सहकारी डॉक्टरांची चौकशी केली आहे.
गुन्हा घडला त्या रात्रीविषयी त्यांच्याकडे काय माहिती आहे, त्या आधारे या डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. तसेच जेव्हा त्यांनी तरुणीसोबत डिनर केला तेव्हा नेमके काय झाले हे देखील सहकारी डॉक्टरांना विचारण्यात आले. त्या रात्री तिला शेवटचे कोणी पाहिले होते हाही प्रश्न विचारला. सीबीआयने सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. सीबीआयने गुन्हा घडला त्यादिवशी ड्यूटीवर असलेल्या आरजी कार रुग्णालयाच्या सिक्योरिटी सुपरवायजरसह दहा जणांना समन्स बजावले आहे. याशिवाय घटनेच्या रात्री ड्युटीवर असलेल्या काही गार्डसनाही बोलावले आहे.
सीबीआयने ड्युटी रोस्टरसह सुपरवायजरला समन्स बजावला आहे. जेणेकरून कोणत्या मजल्यावर कोण ड्युटीवर होते हे कळू शकेल. यापूर्वी रुग्णालयाने निलंबित केलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सीबीआयने शुक्रवारी दुपारी माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांची बराच वेळ चौकशी केली. घोष शुक्रवारी दुपारी ३ वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. घोष यांना सीबीआयने आज पुन्हा समन्स बजावले. तपास यंत्रणेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला की संदीप घोष त्या रात्री कुठे होते? त्याचे म्हणणे इतरांच्या वक्तव्याशी जुळते की नाही, याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत.
सेमिनार हॉलमध्ये आढळला मृतदेह
कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला होता. सेमिनार हॉलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या.
रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे, जो पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडे सोपवला होता. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पीडितेचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वी तिच्यावर बलात्कारही झाला. आरोपीने दोनदा तिचा गळा आवळून खून केला. पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.