मुंबई : (प्रतिनिधी)
१८ आणि २५ ऑगस्ट रोजी देशपातळीवर. आयबीपीएसची बँकेतील भरतीसाठी परीक्षा होत असताना त्याच तारखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी ) परीक्षा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शनिवारी केली.
आयोगाने परीक्षेच्या तारखा बदलल्या नाहीत तर उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य आयोग परिक्षांच्या तारखा ठरवताना यूपीएससी, आयबीपीएस, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परिक्षांच्या तारख्यांचा अंदाज घेऊन त्या ओव्हरलॅप होणार नाहीत, अशा पद्धतीने तारखा ठरवण्याचा प्रघात चालत आला आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतल्याचे यावेळी तरी दिसत नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांवर सूड उगवण्याचे काम करत आहे, असा आरोप लोंढे यांनी केला.
एकतर जागा निघत नाहीत आणि जागा निघल्या तर त्याचे नियोजन व्यवस्थित नसते. परीक्षा फक्त रविवारीच घ्यावी असा काही नियम नाही. कर्नाटकच्या मुख्यमंर्त्यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून परिक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होत असल्याचे दिसताच विद्यार्थ्यांचे हित पाहून आयोगाच्या परिक्षांची तारीख बदलण्याचे निर्देश दिले. जे कर्नाटक सरकार करू शकते ते महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही? असा सवाल त्यांनी केला.