मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. शुक्रवारी सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले. त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दरम्यान, बँकेत महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचा-यांचा ताण वाढला असून, यासंबंधी बँक कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून सत्ताधारी आणि विरोधकही योजनेच्या श्रेयावरुन आमने-सामने आहेत. दुसरीकडे या योजनेचे २ महिन्यांचे ३ हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने ज्या महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळाले नाहीत, त्या महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. तसेच बँकेत जाऊन आधार लिंकही पाहिली जात आहे. त्यामुळे बँकेत गर्दी होत आहे. त्यातून महिलांचा बँक कर्मचा-यांशी वादही होत आहे. तसेच महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बँकेत गर्दी वाढली असून महिला भगिनी बँकेत खाते उघडण्यासाठी येत आहेत. बँकेतील होणारी गर्दी पाहता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात यावे, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे. राज्यातील ९० लाखांपेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम मिळाली असून थेट ३ हजार रुपये बँकेत जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे पैसे जमा होत असल्याने आता इतर महिलांची बँकेत खाते उघडण्यासाठी गर्दी वाढली आहे.
दरम्यान, सरकारने जमा केलेले पैसे काढण्यासाठीही महिला बँकेत गर्दी करत आहेत. बँकेत नव्याने उघडण्यात आलेल्या बँक खात्यांपैकी २० टक्के अकाउंटची केवायसी झालेली नाही. त्यामुळे केवायसी करण्यासाठी गर्दी होत आहे. एकीकडे बँकेत खाते उघडल्यानंतर पैसे जमा झाले म्हणून ही रक्कम काढण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली असतानाच केवायसीसाठीदेखील महिलांची गर्दी होत आहे. त्यामुळे बँक कर्मचा-यांचा ताण वाढला आहे. त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.
बँक कर्मचा-यांशी विवाद
बँकेचे वेगवेगळे चार्जेस आणि मिनिमम बॅलेन्समुळे महिलांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम कपात करण्यात आली आहे. सरकारने पाठवलेल्या ३ हजार रुपयांपैकी काही रक्कम कपात केल्याने महिला बँकेतील कर्मचा-यांशी भांडत आहेत. एकीकडी गर्दी, दुसरीकडे भांडणे, यामुळे मनस्ताप वाढला आहे.
१५ ऑगस्ट रोजी
४८ लाख महिलांना लाभ
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी ३२ लाख महिलांना तर १५ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत आहे.