छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती सरकारने जारदार तयारी सुरू केली असून, विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीने देखील त्या पाश्वभूमीवर दोन दिवसापुर्वी मुंबईत पहिली संयुक्त सभा पार पडली. अशातच मराठा आराक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणले असून, जरांगे यांच्याकडे ७ ते १७ ऑगस्टदरम्यान विवडणूक लढण्यासाठी जवळपास १५० इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जरांगे यांच्याकडे ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील १२ जण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. तर फुलंब्री, कन्नड, सिल्लोड वैजापूर, गंगापूर, मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २९ ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते.
सुत्राच्या मते, जरांगे २९ ऑगस्ट रोजी आंतरवालीत होणा-या बैठकीत पुणे, नाशिक, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यातील उमेदवारांबद्दलचा निर्णय प्राथमिक पातळीवर घेतला जाऊ शकतात. विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून एक माजी आमदार, आमदारपुत्रानेही उमेदवारीसाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून आतापर्यंत १२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात एका माजी आमदाराचा आणि एका माजी आमदाराच्या पुत्राचादेखील समावेश आहे.
जरांगे अजून तीन दिवस स्वीकारणार अर्ज
दरम्यान, २० ऑगस्टपर्यंत जरांगे सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज आणि त्यांचे परिचय पत्र स्वीकारणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्टला आंतरवालीत सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. या बैठकीला जरांगे प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांना आमंत्रित करणार असून, याच बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही ? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.