जम्मू : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पूँछ भागात २० ते २५ दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली. राजौरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी द्विवेदी जम्मू येथे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
राजौरीतील चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याने दहशतवाद्यांच्या योजना आणि पाकिस्तान यांना मोठा धक्का बसला आहे. हे दहशतवादी डांगरी, कंडी आणि राजौरी परिसरात निष्पाप नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांचा खात्मा करणे ही लष्कराच्या मोहिमेची प्राथमिकता होती, असेही द्विवेदी म्हणाले. राजौरी-पूँछ महामार्गामुळेच काश्मीर हे देशाच्या अन्य भागाशी जोडले गेल्याने तिथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या मुख्य कमांडर कारी याच्यासह दोघांना मारले आहे. कारी हा प्रशिक्षित होता; तसेच तो ‘स्रायपर’ही होता, असे ते म्हणाले.