पाच जागा लढविणार, बैठकीत घेतला निर्णय
पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या किमान ५ जागा लढविण्याचा निर्णय शिवसंग्राम संघटनेने घेतला आहे. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला असून अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेणा-या पक्षांबरोबरच आगामी निवडणुकीत युती किंवा आघाडी केली जाईल, अशी भूमिकाही या सभेत घेण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी पुण्यात घेण्यात आली. त्यानंतर बैठकीतील माहिती शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात या सभेत चर्चा करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची यासंदर्भात भेट घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मुंबई या ठिकाणच्या ५ जागा लढविण्यात येणार आहेत. मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांचे स्मारकासंदर्भातील आमच्या मागण्यांना पाठिंबा देणा-यांबरोबरच आगामी निवडणूक लढविण्यात येतील. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर प्राथमिक चर्चा सुरू आहे, असे डॉ. मेटे यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक स्वत: लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.