जम्मू : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकीकडे कॉँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि पीडीपीसोबत आघाडी स्थापन करण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे पक्षातून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची घरवापसी करविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आझाद यांच्याशी वाटाघाटी होत आहेत.
या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांनी कॉँग्रेस पक्षात पुन्हा परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीची अट ठेवल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत दुस-यांदा आझाद यांच्या घरवापसीची चर्चा ऐकिवास येत आहे.
भाजपचा पराभव करण्यासाठी समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका घेत एनसी (नॅशनल कॉन्फरन्स) आणि पीडीपी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहे.
त्याचवेळी कॉँग्रेसनेदेखील या पक्षांसोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. कॉँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची गरज आहे.
भाजप स्वबळावर : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी हा निर्णय जाहीर केला. भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी जी. किशन रेड्डी, सरचिटणीस तरुण चुघ आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पक्ष काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो, असेही रैना यांनी सांगितले.