नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोविड महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका लावला होता. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या उद्भवली होती. ही महामारी संपल्यानंतर नोक-यांंमध्ये स्थिरता आली. पण, आता पुन्हा एकदा देशातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या कंपन्यांमध्ये रिलायन्स, टाटासह अनेक अनेक दिग्गज कंपन्यांची नावे आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आर्थिक वर्षात केवळ रिटेल क्षेत्रात ५२ हजार लोकांनी नोक-या गमावल्या आहेत. कर्मचारी कपात करणा-या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची रिलायन्स रिटेल, टाटा ग्रुपची टायटन, रेमंड, पेज इंडस्ट्रीज, स्पेन्सर इत्यादी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या रिटेल कंपन्यांच्या वार्षिक अहवालात असे दिसून आले आहे की, त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या कर्मचा-यांमध्ये सुमारे ५२ हजारांची कपात केली आहे.
रिलायन्समध्ये ३८ हजारांची कपात : कर्मचा-यांच्या बाबतीत रिलायन्स रिटेल ही देशांतर्गत किरकोळ बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताज्या अहवालानुसार, त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर्मचा-यांची एकूण संख्या २,०७,५५२ पर्यंत कमी केली आहे. एक वर्षापूर्वी रिलायन्स रिटेलमध्ये २,४५,५८१ कर्मचारी कार्यरत होते. म्हणजेच एका आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलमधील सुमारे ३८ हजार लोकांच्या नोक-या गेल्या आहेत.
टायटनमध्येही कपात : गेल्या आर्थिक वर्षात टायटनच्या कर्मचा-यांची संख्या ८,५६९ ने कमी होऊन, १७,५३५ वर आली. पेज इंडस्ट्रीजमध्ये काम करणा-यांची संख्या ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २२,५६४ झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ४२१७ ने कमी आहे. रिलायन्स रिटेल, टायटन, पेज, रेमंड आणि स्पेन्सरसह कर्मचा-यांच्या कपातीचा आकडा तब्बल ५२ हजारांवर पोहोचला आहे.
या कंपन्यांनी कर्मचारी वाढवले …..
रिटेल क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या ट्रेंड्समधील कर्मचा-यांची संख्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात १९,७१६ होती, जी २०२३-२४ या आर्थिक वर्षात वाढून २९,२७५ झाली आहे. तसेच, डी मार्टच्या कर्मचा-यांची संख्या ६०,९०१ वरून ७३,९३२ झाली आहे. व्हीमार्टची कर्मचारी संख्यादेखील ९,३३३ वरून १०,९३५ पर्यंत वाढली आहे.