23.5 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही

मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही

सीएम एकनाथ शिंदेंनी सुनावले देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात. त्यात फडणवीसांमुळे मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण देता येत नाही असे विधान त्यांनी केले. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावे असे म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत खुलासा करत मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी, देवेंद्र्र फडणवीस, अजित पवार एकत्र बसलो. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले. प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस होते. मराठा आरक्षणासाठी जो कायदा केला त्यात फडणवीसांची मोलाची भूमिका होती. अजित पवारही सहभागी होते. मनोज जरांगेंच्या मागणीनुसार मराठवाड्यात ज्यांच्या कुणबी नोंदी ते आम्ही देऊ लागलो. मराठा समाजाला ज्या सवलती होत्या त्या दिल्या. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले त्याला विरोध करायला कोर्टात कोण गेले ते आधी बघा असे त्यांनी सांगितले.

तसेच मराठा आरक्षण मिळू नये यासाठी विरोधी पक्षाचा हात आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम झालेले. तेव्हा मीही कमिटीत होतो. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला विरोध करतायेत हे पूर्णपणे चुकीचे आहे. मनोज जरांगे यांच्या आरोपात तथ्य नाही. आम्ही जो काही निर्णय घेतो तो सर्वानुमते घेतो असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाठराखण केली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंर्त्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाही प्रयत्न केला आणि मी तो थांबवला असे शिंदेंनी सांगितले तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन. आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेंनी केले. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी मी भक्कपणाने उभा राहिलो आहे. परंतु अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR