बंगळूरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबधित एका पत्रकार परिषदेत बोलत असताना एका काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अचानक काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दु:खद घटनेची माहिती दिली.
कर्नाटक राज्य मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक संघटनेचे सदस्य सीके रविचंद्रन यांचे सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान निधन झाले. राज्यपालांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ बेंगळुरू प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. मात्र पत्रकारांशी बोलत असतानाच सीके रविचंद्रन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या घटनेबाबत एक्स पोस्टवरुन दु:ख व्यक्त केले. कर्नाटक राज्य मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक संघटनेच्या वतीने राज्यपालांच्या खटल्याच्या आदेशाविरोधात बंगळुरू प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत असताना संघटनेचे सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ता सीके रविचंद्रन यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात आमचे साथीदार असलेले रविचंद्रन यांच्या अकाली निधनाने खूप दु:ख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या दु:खाच्या वेळी मी त्यांचे कुटुंबीयांसोबत आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.