22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसचे मंत्रालयासमोर आंदोलन

बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसचे मंत्रालयासमोर आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयाच्या समोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

मंत्रालयाच्या गेटपर्यंत हा मोर्चा जाणार होता. पण त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
बदलापूर बलात्कार प्रकरणी आरोपीला २६ तारखेपर्यंत कल्याण न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तर मुलींना आरोपी काय बोलायचा आणि त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा या संदर्भात चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली गेली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने २६ तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

तब्बल ११ तासांनंतर, बदलापूर रेल्वे स्टेशनवरचे आंदोलन पोलिसांनी लाठीचार्ज करून संपवले. साडेतीन वर्षांच्या २ मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूरकर संतापले आणि ११ तास रेल रोको करत लोकल वाहतूक थांबवली. पोलिस अधिकारी आणि मंत्री गिरीश महाजनांच्या आवाहनानंतरही आंदोलक ट्रॅकवरून हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

बदलापुरात साडेतीन वर्षांच्या २ मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात लोकांचा उद्रेक पाहायला मिळाला. नराधम आरोपी अक्षय शिंदेला तात्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी बदलापूरकर, रेल्वे स्टेशनवर एकवटले आणि सकाळी ८ पासून रेल रोको केला. सर्वांत आधी सकाळी साडेसहा वाजता पालकांसह नागरिक बदलापूरच्या आदर्श शाळेबाहेर जमले आणि आंदोलन केले. नंतर हे आंदोलक ८ वाजता बदलापूर स्टेशनला आले आणि रेल रोको आंदोलन केले. सकाळी ९ वाजता आंदोलन पाहून स्टेशनवरचे प्रवासीही या आंदोलनात सहभागी झाले आणि ठिय्या आंदोलन सुरू झाले. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी नागरिक संतप्त झाले.

सकाळी साडेनऊपासून आंदोलनामुळे कल्याण ते कर्जत ही रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळी ११ वाजता पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांनी आंदोलकांना कारवाईचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दुपारी १ वाजता रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा प्रयत्न केला..पण संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. दुपारी पावणेचार वाजता मंत्री गिरीश महाजन बदलापूर स्टेशनला आले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

अखेर ५ वाजून ५२ मिनिटांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज सुरू केला..आणि प्रवाशांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आरोपी अक्षय शिंदेला तात्काळ फाशी द्या, या मागणीसाठी बदलापूरकर आक्रमक होते. आरोपीला ताब्यात द्या, या मागणीसाठी महिलाही आक्रमक झाल्या.
गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडक कारवाईचे आश्वासन दिले. मात्र नागरिक आपल्या मागणीवर ठाम राहिले. मंत्री गिरीश महाजनांनीही बदलापूर रेल्वे स्थानकात येऊन संतप्त नागरिकांशी संवाद साधला. पण महाजनांसमोरही आंदोलकांनी फाशी, फाशीच्या घोषणा दिल्या.
आरोपीला फाशी द्या. नको लाडकी बहीण योजना, हवी सुरक्षा.. असेही पोस्टर झळवण्यात आले. तसेच फाशीसाठी दोरखंडही आणून आपला राग नागरिकांनी व्यक्त केला. तर कायद्यानुसार जी कारवाई तातडीने करायची आहे ती कारवाई करणार, असे आश्वासन गृहमंत्री फडणवीसांनी दिले. तर ज्या पद्धतीने बदलापूरच्या रेल रोको आंदोलनात लाडकी बहीणचे पोस्टर झळकले. त्यावरुन काहींनी या घटनेत राजकारण केल्याचे मंत्री महाजनांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR