25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र२४ ऑगस्टला राज्यव्यापी बंद

२४ ऑगस्टला राज्यव्यापी बंद

महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्ष महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या बंदमध्ये राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे.

शाळेतील सफाई कामगाराने दोन निरागस मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद काल, मंगळवारी बदलापूरमध्ये उमटले होते. प्रक्षुब्ध जमावाने रेल्वे स्थानकात आंदोलन करत रेल्वेसेवा रोखून धरली होती. राज्य सरकारला या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा केली. या चर्चेअंती २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजप, आरएसएसशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केले . पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजप महायुतीचे युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार असून या सरकारला जागे करण्यासाठी २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले.

या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR