मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी-एसपी) अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, यावर आता खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले देशातील तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्यात एक मला, आणि दुसरी आरएसएसचे भागवत आणि देशाचे गृहमंत्री यांचेही नाव आहे. आता ही सुरक्षा कशासाठी दिली याची माहिती नाही. पण कदाचित निवडणुका आहेत यावेळी ऑथेंटीक माहिती मिळवण्याची व्यवस्थाही असू शकते, नक्की काय आहे मला माहिती नाही, असेही खासदार शरद पवार म्हणाले. होममिनिस्ट्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. याची माहिती घेणार असून त्याच पुढ काय करायचे ते ठरवणार आहे, असेही पवार म्हणाले.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरे सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती, त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, आगामी काळात आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना केंद्राची झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सीआरपीएफच्या ५५ सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असेल.