लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष, रेणा साखर कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांना द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन इंडिया पुणे यांच्यामार्फत दिला जाणारा सन २०२४ वर्षातील प्रतिष्ठित मानाचा साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण दि. २४ ऑगस्ट रोजी पुणे येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी सहकार मंत्री तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
डीएसटीएम ही सन १९३६ मध्ये स्थापन झालेली साखर उद्योगातील एक नामांकित संस्था असून सदर संस्थेचे २२०० हून अधिक सदस्य आहेत. साखर उद्योगात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. साखर उद्योगात केलेल्या अतुलनीय योगदानासाठी डीएसटीएममार्फत साखर उद्योग गौरव पुरस्कार हे मानाचे पारितोषक दिले जाते. सदरील पारितोषिक शनिवारी पुणे येथील सभागृह जे. डब्ल्यू. मॅरिएट सेनापती बापट रोड येथे डीएसटीएमच्या कार्यक्रमात उद्घाटनसत्रादरम्यान माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे
दिलीपराव देशमुख यांच्या साखर उद्योग गौरव पुरस्काराने लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव आजपर्यंत राज्य व देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी झाला आहे. मांजरा साखर परिवारातील मांजरा साखर, रेणा, जागृती, मारुती महाराज, विलास साखर, विलास-२, विलासराव देशमुख शुगर हे सर्व साखर कारखाने, सहकारातील अनेक संस्था, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याच मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीपणे पारदर्शकता ठेवून यशाचे शिखर गाठत वाटचाल करीत आहे. आजचा हा सहकार साखर उद्योग गौरव पुरस्काराने लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्यभरातून दिलीपराव देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव*
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना साखर उद्योग डीएसटीएचा मानाचा पुरस्कार जाहीरल्याबद्दल साखर उद्योग तसेच राज्यातून लातूर, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बीड परभणी, नांदेड येथील विविध साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच सहकारी संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.