महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्याने त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुका जवळ आल्या की त्या अनुषंगाने विविध अंदाजांना, चर्चांना पेव फुटते. निवडणुकीत काय होऊ शकते ते जाणून घेण्याची सा-यांनाच उत्सुकता असते. विविध वृत्तवाहिन्या काय घडू शकते याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्या जनमत चाचण्या सुरू होतात. सारेच अंदाज खरे ठरतात असे नाही परंतु भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज घेणे सुरूच राहते. राज्यामध्ये दोन-एक महिन्यात निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कुणाचं सरकार सत्तेत येणार या संबंधीचा इंडिया टुडे-सी व्होटर्सचा अंदाज समोर आला आहे. इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या ‘मूड ऑफ नेशन’ सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला १५० ते १६० जागा मिळू शकतात तर महायुतीच्या पदरात १२० ते १३० जागा पडू शकतात.
मतांची टक्केवारी पाहता महायुतीला ४२ टक्के तर महाविकास आघाडीला ४४ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४३.७१ टक्के मते तर महायुतीला ४३.५५ टक्के मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘इंडिया टुडे’च्या सर्व्हेतून महाराष्ट्रातील जनतेने सरकार, मुख्यमंत्री, खासदार-आमदार यांच्या कार्यपद्धतीवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यातून जनतेचे समाधान आणि असंतोष याबाबतचा अंदाज येऊ शकतो. मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण १५ जुलै ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान करण्यात आले. सर्वेक्षणात १ लाख ३४ हजार ४३६ लोकांची मते जाणून घेण्यात आली. या सर्व्हेमध्ये राज्यात विविध योजनांचा धडाका उडवून देणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ ३.१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
सर्वेक्षणानुसार राज्यातील २५ टक्के लोक राज्य सरकारच्या कामकाजावर पूर्णपणे समाधानी आहेत तर ३४ टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत पण सुमारे ३४ टक्के जनता सरकारच्या कामावर नाराज आहे. म्हणजे सरकारच्या कामगिरीबाबत जनतेने संमिश्र कौल दिला आहे असे म्हणता येईल. खासदारांच्या कामगिरीवर ३२ टक्के लोक समाधानी आहेत तर २२ टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आहेत आणि तेवढेच लोक असमाधानी आहेत. आमदारांच्या कामगिरीवर ४१ टक्के लोक समाधानी आहेत. खासदारांच्या तुलनेत आमदारांनी आघाडी मारली आहे असे दिसते. २६ टक्के लोक आमदारांच्या कामावर काहीसे समाधानी आहेत तर २७ टक्के लोक असमाधानी आहेत. म्हणजे खासदारांपेक्षा आमदारांच्या कामावर जनता अधिक समाधानी आहे असे दिसते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सत्ताधारी आपल्याच पक्षाच्या आमदारांना अधिक निधी देतात मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात.
काही दिवसांपूर्वी टाइम्स-मार्टिझचा सर्व्हे प्रकाशित झाला होता. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला ९५ ते १०५, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १९ ते २४ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ ते १२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभेसाठी भाजपने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीऐवजी महाविकास आघाडीला पसंती दिली होती. आता तीन महिन्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याबाबत ‘इंडिया टुडे’ने केलेल्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना देशातील ३३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुस-या क्रमांकावर आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (१४ टक्के), तिस-या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(९ टक्के) आहेत. चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (४.७ टक्के), पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (४.६ टक्के) तर सहाव्या क्रमांकावर मुख्यमंत्री शिंदे आहेत.
त्यांना ३.१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सातव्या क्रमांकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आठव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा, नवव्या स्थानी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी तर शेवटच्या दहाव्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. ‘इंडिया टुडे’ने आपापल्या राज्यात कोणता मुख्यमंत्री लोकप्रिय आहे असाही एक सर्व्हे केला आहे. महाराष्ट्रातील या सर्व्हेत पहिल्या १० क्रमांकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावच नाही! या सर्व्हेत सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग हे त्यांच्या राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुस-या क्रमांकावर आसामचे हेमंत बिसवा सरमा(५१ टक्के) तर तिस-या क्रमांकावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (४६ टक्के) आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील असे बोलले जात आहे.
राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्यात विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे. शिवाय, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, शेतकरी नेते राजू शेट्टी, एमआयएमचे इम्तियाज जलील, प्रहारचे बच्चू कडू या नेत्यांमध्ये तिस-या आघाडीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच तापलाय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील निवडणुकीत उतरणार काय तेही पहावे लागेल. त्यामुळे कोण जाणार, कोण येणार याबाबत तोंडावर बोट ठेवावे लागेल!