वाशिम : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्सयुक्त चॉकलेट दिले जातात. विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासन स्तरावर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत चॉकलेट वाटप केले जात असतात.
प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील हाच पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामागील कारण म्हणजे परत एकदा वाशिममध्ये पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वाशिम जिल्ह्याच्या आडोळी या गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चॉकलेटची कार्यक्षमता समाप्त होण्याच्या तारखेच्या अगोदरच चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हा पोषक आहार हानिकारक आणि धोका निर्माण करणारा ठरत आहे. राज्यात सातत्याने असे प्रकार उघडकीस येत असल्याने या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित कंत्राटदारावर वेळीच योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी एका प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.