नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता नाशिकमध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाज कल्याण विभागाच्या मद्यधुंद अधीक्षकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद वाहनचालकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवले आहे. विशेष म्हणजे मद्यधुंद गाडी चालविणारा समाज कल्याण विभागाचा अधीक्षक आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अधीक्षक विजय चव्हाण याला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. ज्यांनी नागरिकांना शिस्त लावणे अपेक्षित आहे ते सरकारी अधिकारीच बेदरकारपणे वाहन चालवित असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.